औरंगाबाद: राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समजल्या जाणार्या समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. महिनाभरापूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची चर्चा होती. मात्र, उद्घाटनाविनाच या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्ग चकचकित करण्याची तयारी प्रशासनाची सुरू आहे.
निवडणुका आल्या की, श्रेयवादाची लढाई सुरू होते. नागपूर ते मुंबई हा 710 किलोमीटरचा महामार्ग हा फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. या महामार्गाने सरकारचा रस्ता सुकर होईल, अशी आशा सरकारला आहे. लोकसभा निवडणुकीत या महामार्गाची फारशी चर्चा झाली नसली तरी विधानसभा निवडणुकीत समृद्धी महामार्ग हा प्रमुख मुद्दा असणार यात शंका नाही. महिनाभरापूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून या महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार होती. मात्र, तसे झाले नाही. मंत्र्यांच्या उद्घाटनाविनाच समृद्धी महामार्गाच्या खडीकरणाचे काम सुरू झाले. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील किमान एक टप्पा पूर्ण करून या कामाचे मार्केटिंग करण्याची योजना सत्ताधार्यांची आहे.
जालना जिल्ह्यातील तीन ते चार आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून हा महामार्ग जातो. याचा लाभ विधानसभा निवडणुकीत होईल, अशी आशा सरकारला वाटते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वीचे उद्घाटन टाळून आता विधानसभा निवडणुकीपूर्वी थाटामाटात या महामार्गाचे फोटोसेशन करण्याचा इरादा सरकारचा आहे.